Hot Posts

6/recent/ticker-posts

रतनलाल बघेले वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानीत

 


गोंदिया, दि.09 : 

        कृषि विभागाच्या वतीने सन 2020, 2021 व 2022 या तीन वर्षात कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व अधिकारी यांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन वरळी (मुंबई) येथील एन.एस.सी.आय. डोम येथे 29 सप्टेबर 2024 रोजी करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे हस्ते लोधीटोला (चुटीया) येथील प्रगतशील शेतकरी रतनलाल गोधनलाल बघेले यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

सेंद्रिय शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषि मंत्री धनंजय मुंडे, कृषि विभाग सचिव जयश्री भोज, आयुक्त (कृषि) रविंद्र बिनवडे व राज्याचे कृषि विभागाचे संचालक उपस्थित होते. रतनलाल बघेले यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजित आडसुळे, उपविभागीय कृषि अधिकारी मंगेश वावधने, तालुका कृषि अधिकारी पवन मेश्राम, कृषि अधिकारी मुनेश्वर ठाकुर, कृषि सहाय्यक भावेश दमाहे व आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनिल खडसे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

रतनलाल बघेले हे मागील 15 ते 20 वर्षापासून लोधीटोला (चुटीया) येथे सेंद्रिय शेती करत आहेत. एकूण 10 एकर शेती पैकी 3 एकर शेतात पपई, आंबा हे फळपिके व भाजीपाला पिकामध्ये वांगी, चवळी,  मिरची, लवकी, कारले, अळुची पाने, हळद, अद्रक घेतात व उर्वरित क्षेत्रात सेंद्रिय पध्दतीने भात पिकाची लागवड करतात. त्यांनी जिल्ह्यात सर्वात प्रथम सेंद्रिय पपई लागवड केलेली आहे. रतनलाल बघेले यांना पुर्वी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी व कृषि मंत्रालय नवी दिल्ली प्रशिक्षणात उत्कृष्ट सहभाग व जिल्ह्यात कृषि विभागामार्फत आयोजित अनेक कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आलेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या