Hot Posts

6/recent/ticker-posts

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या कुटूंबांना मिळणार हक्काचे पक्के घर

 


रमाई आवास योजनेंतर्गत 848 नविन घरकुलांना मंजूरी...

गोंदिया, दि.3 : 

      अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील कुटूंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी या उद्देशाने सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी ‘रमाई आवास योजना’ राबविण्यात येते. सदर याजनेअंतर्गत ग्रामीण भागात 269 चौ.फुटाचे पक्के घराचे बांधकामाकरीता सर्वसाधारण क्षेत्राकरीता 1 लाख 20 हजार आणि नक्षलग्रस्त व डोंगराळ दुर्गम क्षेत्राकरीता 1 लाख 30 हजार वैयक्तिक स्वरुपात लाभ देण्यात येतो.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास (ग्रामीण) योजनेच्या समितीची सभा पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे अध्यक्षतेखाली 14 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर सभेत गोंदिया जिल्ह्यातील अनूसूचित जाती व नवबौध्द घटकातील सन 2023-24 मधील 321 व 2024-25 मधील 527 पात्र लाभार्थी कुटूंबाच्या घरकुलांना मंजूरी व प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. सदर मंजुरी पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी प्रजित नायर, समाज कल्याण सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांचे उपस्थितीत जिल्हास्तरीय समितीच्या सभेत देण्यात आली. सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी व पात्र लाभार्थी प्रस्तावांची छाननी करण्यास पुष्पलता धांडे व आत्माराम खंडाते यांनी अथक परिश्रम घेतले.

प्रतिक्रीया...

मागासवर्गीय विमुक्त जाती व भटक्या जमातीतील गरजु लोकांना शासकीय योजनांचा लाभ देऊन समाजाच्या प्रवाहात आणण्याकरीता सामाजिक न्याय विभाग सतत प्रयत्नशील आहे. सदर घरकुल योजनेकरीता जिल्ह्यातील पात्र अर्जदारांनी संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेमार्फत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

                - विनोद मोहतुरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या