Hot Posts

6/recent/ticker-posts

निक्षय मित्र बनवून क्षयरुग्णांना पोषण आहार देण्यासाठी ; नागरिकांनी समोर यावे- जिल्हाधिकारी प्रजित नायर


गोंदिया, दि. 08 : 

      प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षय मित्रांची नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सर्व क्षयरुग्णांना पोषण आहार देण्यासाठी विविध क्षेत्रातील खाजगी संस्था, लॉयन्स क्लब, रोटरी क्लब व इतर सामाजिक संस्था यांच्यामार्फत पोषण आहार पुरविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 1 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर व मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय टीबी फोरम व जिल्हा को-मॉर्बीडीटी सभा संपन्न झाली. सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार, डॉ.वेदप्रकाश चौरागडे, डॉ.देव चांदेवार, डॉ.रोशन राऊत, डॉ.सचिन चौधरी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी टीबी फोरम व जिल्हा को-मॉर्बीडीटीचे महत्व व कार्य यांचे सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत येणारे सर्व निर्देशांकांची माहिती देण्यात आली. सभेमध्ये जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी शासकीय वैद्यकीय अधिकारी, खाजगी वैद्यकीय व्यावसायीक व तालुका आरोग्य अधिकारी यांना टीबी नोटीफिकेशन व इतर सर्व निर्देशांकात वाढ होण्यासाठी सांगितले.

 उपचार घेणाऱ्या सर्व क्षयरुग्णांना निक्षय पोषण योजनेचा लाभ मिळण्याकरीता प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद निक्षय प्रणालीमध्ये करणे अनिवार्य आहे. त्याकरिता क्षयरुग्णांची नोंद करण्यासाठी (नोटीफिकेशन) करीता 500 रुपये अनुदान देण्यात येते. तसेच क्षयरुणाच्या उपचाराअंती आउटकमची नोंद केल्यानंतर 500 रुपये अनुदान देण्यात येते. यासाठी वेळेवर क्षयरुग्णांची नोंद निक्षय पोर्टलवर करणे अनिवार्य आहे. तरी सर्व क्षयरुग्ण निदान करणाऱ्या व क्षयरुग्णास उपचार देणाऱ्या आरोग्य संस्थांनी आपल्या संस्थेचे नाव निक्षय प्रणालीमध्ये नोंदवून क्षयरुग्णांची नोंदणी करावी व बँक खात्याबद्दल माहिती घेवून निक्षय पोषण योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे. सर्व क्षयरोग संबंधिच्या प्रयोगशाळा तपासण्या, एक्स-रे तसेच संपूर्ण कालावधीचा उपचार हा शासकीय आरोग्य संस्था तसेच शासकीय प्रयोगशाळांमध्ये विनामूल्य केला जातो अशी माहिती सभेत देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या