Hot Posts

6/recent/ticker-posts

बाप्पांचे आज आगमन..! देवरी शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त...

 


देवरी,दि.07 ; (मुकेश खरोले..🖋️)

     लाडके बाप्पा आज, शनिवारी गणेश चतुर्थीला विराजमान होणार आहेत. असे असले तरी देवरी शहर व ग्रामीन सार्वजनिक मंडळांच्या बहुतांश गणेशमूर्ती गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच ढोल-ताशांच्या निनादात प्रतिष्ठापनेसाठी मंडपात दाखल झाल्या. आज विधिवत गणपती बाप्पा आसनस्थ होत असून घरोघरीही गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. दरम्यान, गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला देवरी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची अलोट गर्दी उसळली होती.

विघ्नहर्त्या बाप्पांचा गणेशोत्सव आज शनिवार दि. 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गणेश चतुर्थीला सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती बाप्पांची प्रतिष्ठापना होत आहे. लाडक्या बाप्पांच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती नेल्या जात आहेत. शुक्रवारीही सकाळपासूनच देवरी शहरात सार्वजनिक तसेच घरगुती बाप्पांच्या मूर्ती नेण्यासाठी गणेश भक्तांची वर्दळ सुरु होती. पारंपारिक वाद्याच्या दणदणाटात मंडळाचे बाप्पा मंडपाकडे रवाना होत होते.

या सोहळ्याला वरुणराजानेदेखील हजेरी लावली. शुक्रवारी दुपारी  देवरी शहरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गणेश भक्तांची धांदल उडाली होती. अनेकजण मूर्तीला प्लास्टिकचे आवरण घालून मार्गस्थ झाले. सायंकाळपासून मात्र पावसाने उघडकीस दिली. गणेशमूर्ती नेताना बालगोपाळांचाही उत्साह दांडगा होता. आर्डरप्रमाणे मूर्तीकाम पूर्ण केले जात असल्याने परगावच्या मूर्ती आदल्या दिवशीच रवाना झाल्या. अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापनेची तयारी रात्री उशीरापर्यंत सुरु होती. शनिवारी सर्वत्र बाप्पांची षोडोपचारी पूजा होवून विधीवत प्रतिष्ठापना होणार आहे. देवरी शहरासह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने ओसंडल्या आहेत. बाजारपेठांसह अवघ्या वातावरणातच गणेशोत्सवाचा उत्साह संचारला आहे. हा उत्साह पुढील अकरा दिवस कायम राहणार आहे.

देवरी पोलिसांचा शहरात चोख बंदोबस्त...

गणेशोत्सव 2024 काळात शहरात ठिकठिकाणी आज विराजमान होत असलेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो भाविक घराबाहेर पडतात. तालुक्याच्या ग्रामीन भागतील नागरिक शहरात मोठ्या संख्येनं येत असल्यानं त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनीही देवरी शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरात शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आणि जास्त गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन देवरी पोलिसांनी जनतेला केल आहे.  महिला, लहान मुलं तसेच वृद्धांची सुरक्षा ही देवरी पोलिसांची प्राथमिक जबाबदारी आहे. मुली आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटनांबाबत देवरी पोलीस सतर्क राहतील. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना कोणत्याही संशयास्पद किंवा बेवारस वस्तूची माहिती ताबडतोब पोलिसांकडं देण्याचा सल्ला दिला आहे.  कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन मदतीसाठी जनतेनं पोलीस हेल्पलाइन 100 किंवा 112 वर संपर्क साधण्याचं आवाहनही देवरी पोलीसांतर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या