Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी यांची प्रकल्प कार्यालयाला भेट


गोंदिया, दि.20 ;  

        एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयीन अडीअडचणी संदर्भात देवरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी १२ सप्टेंबर २०२४ रोजी भेट देऊन चर्चा केली तसेच सर्व कार्यासन विभागाची पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. नायर यांनी कार्यालयामार्फत सुरु असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. मागील दोन-तीन वर्षापासून देवरी प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरीता विविध योजनेअंतर्गत "मिशन आधार" (NEET/JEE/CET) प्रवेशपूर्व तयारी, मिशन शिष्यवृती, प्रेरणादायी व्यक्तिमत्व व्याख्यान, ॲथलेटिक्स व  गोंडी कला या माध्यमातून आश्रमशाळेतील विद्यार्थी पुढे जात असल्याबाबत प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांचेकडून माहिती प्राप्त करुन घेतली.

प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येत असलेले शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह देवरी येथील दोन्ही वसतीगृहाला भेट देऊन वसतीगृहातील विदयार्थींना देण्यात येत असलेल्या शैक्षणिक व भौतिक सोयीसुविधांची पाहणी करुन वसतीगृहातील विद्यार्थिनींसोबत संवाद साधून शैक्षणिक, भौतिक सोयीसुविधा संदर्भात चर्चा केली तसेच आश्रमशाळा व वसतीगृहातील विद्यार्थी निवासी राहत असल्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य काळजी घेण्याच्या गृहपाल यांना सूचना दिल्या तसेच अडचणीच्या ठरणाऱ्या समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना सूचना  दिल्या.

 एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल बोरगाव/बाजार येथे भेट देऊन शाळेतील सायन्स लॅब पाहिले. त्यानंतर सायन्स लॅब मधील तयार करण्यात आलेल्या विविध प्रोजेक्टचे विश्लेषण विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले, सायन्स लॅबचे विश्लेषण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे  जिल्हाधिकारी यांनी कौतुक करुन विद्यार्थ्यांना शैक्षणिक  मार्गदर्शन केले व यश कशाप्रकारे प्राप्त करता येईल यासंदर्भात सविस्तर मार्गदशन केले. तसेच शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा बोरगाव/बाजार येथे भेट देऊन तेथील विद्यार्थीनींसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याबाबत विद्यार्थ्यांना अडचणीच्या ठरणाऱ्या समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याबाबत गृहपाल व मुख्याध्यापक यांना सूचना दिल्या.

अप्पर आयुक्त, आदिवासी विकास नागपूर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेले ब्रायटर माईन्ड  या नविन उपक्रमाला जाणून घेतले व या उपक्रमाचे प्रयोग बघितले व उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या  विद्यार्थीनींचे जिल्हाधिकारी यांनी कौतुक करुन विद्यार्थीनींना त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 जिल्हाधिकारी यांच्या  एकदिवसीय भेटीच्या माध्यमातून आदिवासी विभागातील आश्रमशाळेत शिक्षण  घेत असलेल्या  आदिवासी  विद्यार्थ्यांसोबत साधलेला संवाद मुलांच्या भविष्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांनी आशा व्यक्त केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या