Hot Posts

6/recent/ticker-posts

काळ्या फिती लावून शिक्षक कार्यावर...! २५ सप्टेंबर ला सर्व शाळा राहणार बंद!

 


गोंदिया,दि.18 ; 

       राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम करणाऱ्या शासन निर्णयांविरुद्ध राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना एकवटल्या असून 25 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार आहेत, शिक्षकांचे सामूहिक रजा आंदोलन होणार आहे. करिता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक गोंदिया (तहसील कार्यालय गोंदिया) येथून दिनांक २५ सप्टेंबर ला   दुपारी १२.०० वाजता  जिल्हाधिकारी कार्यालयावर  विराट महामोर्चा निघणार आहे.

राज्य शासनाने संचमान्यता, कंत्राटी पद्धतीने भरती, आधार कार्ड आधारित शिक्षक निश्चिती संबंधाने निर्णय रद्द करण्यासाठी प्राथमिक संघटना संघर्ष तीव्र करत शासनाच्या प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या धोरणाविरोधात राज्यातील शिक्षक संघटनांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षक भवन पुणे या ठिकाणी पार पडलेल्या राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या बैठकीत शनिवारी १४ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आला आहे.

या अनुषंगाने शिक्षक कृती महासंघ जिल्हा गोंदिया ( जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना समुह) च्या दिनांक १६ सप्टेंबर ला राज्य संघटना समुहाने ठरविलेल्या नियोजनान्व्ये दिनांक १७ सप्टेंबर पासून काळ्या फिती लावून कार्यावर आणि दिनांक २५ सप्टेंबरला सर्व शाळा बंद करून शिक्षक सामुहिक रजा आंदोलनात सहभागी होऊन राज्य संघटना समुहाने ठरविलेल्याप्रमाणे आपणा सर्व शिक्षक बंधु भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक कृती महासंघाने केले आहे.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्ष केले आहे. ‌एकीकडे संचमान्यता अन्यायकारक शासन निर्णय तर दुसरीकडे २० अथवा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील नियमित शिक्षकाचे एक शिक्षक पद कायमचे गोठवून कंत्राटी पद्धतीने सेवा निवृत्त शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय ५ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार घेतला आहे. या दोन्ही निर्णयाच्या परिणामी विद्यार्थ्यांचे शिक्षणच बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. बालकांना दर्जेदार शिक्षणापासून दूर लोटण्याच्या निर्णयास सर्व क्षेत्रातून विरोध होणे गरजेचे आहे.  

विद्यार्थी शाळेत दाखल आहे मात्र काही विद्यार्थ्यांचे जन्मतारखेचे प्रमाणपत्र नसल्याने आधार कार्ड निघत नाही. मात्र या वास्तवाकडे दुर्लक्ष करून आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक संच निर्धारणासाठी व योजनांच्या लाभासाठी ग्राह्य न धरण्याची शासनाची भूमिका अचंबित करणारी आहे. अशाप्रकारच्या शासन धोरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा बंद करून खाजगीकरण करणे आणि विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीच्या दर्जेदार शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याच्या शासन धोरणासाठी हानून पाडण्यासाठी राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी निर्धार केला आहे.

यासंबंधाने पार पडलेल्या बैठकीत मंगळवार दि. १७ सप्टेंबर पासून शिक्षकांनी काळी फीत लावून विरोध प्रदर्शन करणे. बुधवार दि. १८ सप्टेंबर पासून WhatsApp च्या कथीत प्रशासनिक गृपमधून बाहेर पडून असहकार सुरू करणे. दि. २५ सप्टेंबर रोजी सर्व शिक्षकानी रजेवर जात प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढणे अशाप्रकारे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे निवेदन पाठविण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या