Hot Posts

6/recent/ticker-posts

देवरी ; धानपिकावर रोगांचा प्रादुर्भाव तर शेतकरी चिंतेत



मार्गदर्शनाची केली जातेय मागणी...

देवरी,दि.16 ; 

   तालुक्यात धानपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत  आहे. वेळोवेळी करपा हा बुरशीजन्य रोग आहे. यात पानांवर पिकांवर फवारणी करावी लागत असल्याने आर्थिक संकटाचा सामना देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पिकांवर खोडकिडा, करपा, पाने गुंडाळणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने कोणत्या कीटकनाशकांची फवारणी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तेव्हा कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

यंदा वेळी-अवेळी पडणारा पाऊस, सतत बदलणारे वातावरण यामुळे धानपिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या हलक्या वाणाचे पीक परिपक्व अवस्थेत असून, काही ठिकाणी धान कापणीला सुरुवातही झाली आहे. त्यातच भारी वाणाच्या पिकाला अधिक कालावधी लागत असल्याने पिकांवर रोगांचे आक्रमण वाढतच आहे. रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. गर्भावस्थेत असलेल्या धान पिकावर विविध रोगांनी हल्ला चढविल्याने उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

महागडी कीटकनाशके आवाक्याबाहेर असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. शेतकरी धानाच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपला प्रपंच कसाबसा चालवितो. जर धान पिकावरच अशा रोगांचा प्रादुर्भाव झाला तर काय करायचे ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. तसेच आर्थिक परिस्थिती बिघडण्याची भीतीदेखील शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. या रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविणे महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या